Ad will apear here
Next
आर्टिस्ट्री : कोवळ्या कलाकारांच्या प्रगल्भ कलेचं प्रदर्शन


‘आर्टिस्ट्री २०१९’ नावाचं कलाप्रदर्शन सध्या रत्नागिरीत भरलं आहे. हे प्रदर्शन भरविणारे कलाकार आहेत १७ ते २२ या वयोगटातले; पण वयाने लहान असले तरी त्यांची कला मात्र अत्यंत दर्जेदार आणि प्रगल्भ आहे, हे त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून दिसतंय. त्या प्रदर्शनाविषयी...
............
रत्नागिरी ही रत्नांची भूमी आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या रत्नांचा इतिहास या भूमीला आहे. या रत्नांची यादी देण्याची गरज नाही. या इतिहासातून तयार झालेला नावलौकिक कायम राखण्याचं काम प्रत्येक पिढी करत असते. रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात सध्या भरलेलं ‘आर्टिस्ट्री २०१९’ हे प्रदर्शन त्याचीच खात्री पटवून देतं. 

या प्रदर्शनाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे प्रदर्शन विविध कलाप्रकारातील कलाकारांनी स्वतःच एकत्र येऊन सादर केलं आहे. यांतील सर्वांत लहान कलाकार १७ वर्षांचा, तर सर्वांत मोठा कलाकार जेमतेम २२ वर्षांचा आहे. उदयोन्मुख कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळण्यात अनेक अडचणी येतात. खूप संघर्ष करावा लागतो. संघर्षातूनच प्रगती होते हे खरं असलं, तरी खूपच प्राथमिक गोष्टींसाठी जास्त संघर्ष करावा लागला, तर कलाकार कलेपासून दूर जाण्याची शक्यता असते; पण रत्नागिरीतील या उदयोन्मुख कलाकारांनी मात्र एकत्र येऊन धीटपणाने स्वतःच्या कलेचं प्रदर्शन भरवलं आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे.



चिन्मय बेर्डे, श्वेता केळकर, निमिष वैद्य आणि राजश्री शिधये यांनी आठ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘आर्टिस्ट्री-रत्नागिरी’ हा ग्रुप स्थापन केला. असा काही ग्रुप स्थापन करण्याच्या कल्पनेवर गेल्या वर्षी थिबा राजवाडा महोत्सवानंतर चिन्मय आणि श्वेताचं सहज बोलणं झालं. त्यानंतर चौघांमध्ये चर्चा होऊन असा ग्रुप स्थापन करण्याचं निश्चित झालं आणि यंदा तो ग्रुप स्थापन करण्यात आला. या ग्रुपचं प्रदर्शन आयोजित करून आपल्यासह आपल्या मित्र-मैत्रिणींच्या कलांना त्यात संधी द्यायची, असं त्यांनी ठरवलं. त्यातून २९ नोव्हेंबर ते एक डिसेंबर २०१९ या कालावधीत हे प्रदर्शन भरवायचं नक्की झालं. 

कल्पना मांडणं सोपं असलं, तरी ती प्रत्यक्षात आणणं सोपं नव्हतं; मात्र त्यासाठी त्यांनी धडपड केली आणि त्यांना अनेक घटकांची चांगली साथ मिळाली. काहींनी आर्थिक मदत केली, आगाशे विद्यामंदिराने सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून दिली. आणखी अनेकांनी वेगवेगळ्या रूपाने मदत केली. 

चिन्मय बेर्डे

सोशल मीडियाचा चांगला वापर या ग्रुपने करून घेतला. आपल्या या प्रदर्शनात काय-काय असणार आहे, याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून द्यायला सुरुवात केली. नामवंत कलाकारांच्या प्रोत्साहनपर शब्दांनीही त्यांना हुरूप मिळाला. त्यांचे व्हिडिओही त्यांनी फेसबुकवरून शेअर केले. त्यामुळे लोकांनाही या मुलांच्या प्रयत्नांचं गांभीर्य कळलं. त्यामुळेच अगदी पहिल्याच दिवशीपासून या प्रदर्शनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना हे प्रदर्शन अगदी मनापासून आवडल्याचं तिथे अनेकांनी लिहिलेल्या अभिप्रायावरून कळतं. 

राजश्री शिधये

या प्रदर्शनात काय काय आहे?
वेगवेगळ्या देशांचं वेगवेगळ्या काळातलं चलन, निसर्गचित्रं, स्केचेस, टेपेस्ट्री, बांबूपासून बनविलेली घरं, चित्रं, छायाचित्रं, कविता, सुलेखन (कॅलिग्राफी) अशा वेगवेगळ्या कलांचा आस्वाद या प्रदर्शनात घेता येतो. यातलं काहीही पाहिल्यानंतर ‘हे इतक्या कमी वयातल्या कलाकारांनी केलेलं आहे’ यावर अजिबात विश्वास बसत नाही, इतकं या सगळ्याच कलांचं सादरीकरण उत्तम आहे. हे सगळे कलाकार रत्नागिरीतलेच आहेत.

श्रेयस प्रभुदेसाई

चिन्मय बेर्डेने तीन हजारांहून अधिक नाणी आणि नोटांचा संग्रह केला आहे. त्यात विविध देशांतल्या विविध काळातल्या चलनाचा संग्रह आहे. तो पाहताना वेगवेगळ्या देशांत चलनछपाईसाठी येणारा खर्च, अन्य देशांतली आणि आपल्या देशातली स्थिती, तंत्रज्ञान अशा सगळ्याची माहितीही तो देत असतो. साहजिकच पाहणारी व्यक्ती काही तरी वेगळी माहिती घेऊनच पुढे जाते. 



तीच गोष्ट हृषीकेश मुळ्येची. हृषीकेश जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् या नामवंत संस्थेत शेवटच्या वर्षात शिकतोय. त्याची चित्रं तर उत्तम आहेतच; पण टेपेस्ट्री या सहज पाहायला न मिळणाऱ्या कलाप्रकाराचं सादरीकरणही त्यानं या प्रदर्शनात केलं आहे. वस्त्रांपासून साकारल्या जाणाऱ्या या कलेचं वेगळेपण तो सांगतो आणि त्याची वैशिष्ट्यंही सांगतो. ‘गायतोंडेंची अमूर्त चित्रकला वेगळी आणि एम. एफ. हुसेन यांची अमूर्त चित्रकला वेगळी. एकाचं तंत्र वेगळं, एकाचे विचार वेगळे...’ त्याला काही शंका विचारल्या, तर अशी अभ्यासपूर्ण उत्तरं मिळतात. साहजिकच पाहणाऱ्याच्या ज्ञानात भर पडते. 

आपल्याकडच्या ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिकण्यासाठीची शिष्यवृत्ती नसल्याने आपल्या एका उत्तम कलाकार असलेल्या मित्राची परदेशी कलाशिक्षण घेण्याची संधी कशी हुकली, हेही तो सांगत होता. उदयोन्मुख कलाकारांना यासाठी सरकारची साथ हवी, अशी मागणी तो मांडतो, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक अधोरेखित होतं. 

श्वेता केळकर

श्वेता केळकरच्या ब्रशने चितारलेली निसर्गचित्रं पाहून हरखून जायला होतं. आर्किटेक्चरचं शिक्षण घेत असलेली श्वेता छंद म्हणून ही कला जोपासते. तिची चित्रं एखाद्या व्यावसायिक कलाकाराच्या तोडीस तोड आहेत. झाडांच्या पानांचे वेगवेगळ्या ऋतूंत बदलणारे रंग, पानगळीचा ऋतू तिनं उत्तम पद्धतीने चितारले आहेत.

निमिष वैद्य

निमिष वैद्यची फोटोग्राफीही अशीच सुंदर आहे. त्याचा कॅमेरा आपल्याला प्राणी, पक्षी, फुलपाखरं, किल्ले, नदी, समुद्र निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवतो. 

अनुजा कानिटकर

अनुजा कानिटकरने काढलेली स्केचेस पाहूनही थक्क व्हायला होतं. प्रदर्शनाच्या ठिकाणीही ती झटपट स्केचेस काढताना दिसते. 

सानिका गोरे आणि सलिल गोरे या भावा-बहिणीच्या कलाही आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळतात. सानिकाची फोटोग्राफी आणि सलिलची चित्रं... दोघांचेही आविष्कार छान आहेत. सलिलने साकारलेली मंदिरं आणि इमारतीची चित्रं आपल्याला जुन्या काळातल्या पुस्तकांतल्या सुंदर चित्रांची आठवण करून देतात. 

ओंकार कांबळे

ओंकार कांबळेने काढलेली नामवंत कलाकारांची स्केचेस आणि निसर्गचित्रंही त्याची कलेतली तयारी दाखवून देतात. अलीकडेच स्केचिंगला सुरुवात केलेल्या बारावीतल्या श्रेयस प्रभुदेसाईची स्केचेसही त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याची खात्री देतात. राजश्री शिधयेच्या कविता तिचे वेगवेगळ्या विषयांवरचे विचार मांडतात आणि विचार करायलाही लावतात. काही हलक्याफुलक्या कल्पनाही मांडतात.



भूषण वेलयेने काढलेली चित्रं आणि विपुल पुनसकरची कॅलिग्राफीही सुरेख. बांबूपासून किती चांगल्या प्रकारच्या कलाकृती करता येऊ शकतात, हे नितीन लिंगायतने साकारलेल्या मॉडेल्समधून दिसतं. 

नितीन लिंगायतया प्रत्येकाबद्दल, त्याच्या कलेबद्दल लिहिण्यासारखं खूप आहे. यंदा फक्त रत्नागिरीतील कलाकार या प्रदर्शनात सहभागी झाले असले, तरी पुढच्या वर्षीपासून बाहेरच्या कलाकारांनाही संधी द्यायचा त्यांचा मानस आहे. 

या प्रदर्शनात रत्नागिरीतील श्रीकांत ढालकर, राजेंद्र मुळ्ये यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या होत्या. 

अशा रीतीने या उदयोन्मुख कलाकारांनी अत्यंत आत्मविश्वासाने हे प्रदर्शन भरवले आहे. ‘आपल्याजवळ काय आहे आणि त्याची जोपासना कशी करायला हवी,’ हे त्यांना या वयातच उत्तम पद्धतीने कळले आहे. या प्रदर्शनातून मिळणारे अनुभव त्यांच्या जडणघडणीसाठी उपयुक्त ठरतील. त्यांची कला पाहून मोठी ऊर्जा मिळाल्याचा अनुभव येतो. त्यांच्या प्रयत्नांना समाजाचे प्रोत्साहन आणि शुभेच्छांची जोड मिळाली, तर ते उत्तम कलाकार म्हणून नक्की नावारूपाला येऊ शकतील.

- अनिकेत कोनकर

प्रदर्शनाचे स्थळ : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर, नाटेकर सभागृह, रत्नागिरी
वेळ : एक डिसेंबर २०१९पर्यंत (सकाळी नऊ ते रात्री आठ) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZOMCG
Similar Posts
सूर-तालांच्या बहारदार आविष्काराने रंगला ‘आर्ट सर्कल’ संगीत महोत्सव रत्नागिरी : इतिहासाच्या आठवणी सांगणाऱ्या आणि कलेचा समृद्ध वारसा असलेल्या भव्य थिबा राजवाड्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ख्यातकीर्त कलाकारांनी सूर-तालांचा बहारदार आविष्कार सादर केला आणि तीन संध्याकाळी रसिक रत्नागिरीकर एका वेगळ्याच विश्वात रमून गेले. २४ जानेवारीला डॉ. कनीनिका निनावे आणि पूजा भालेराव
एका वेगळ्या मूर्तिकाराच्या ध्यासाची गोष्ट रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातले सुभाष मेहतर हे अत्यंत उत्तम मूर्तिकार आहेत. गणपतीच्या रेखीव मूर्ती ते घडवितात. लाकडावर चांगलं कोरीव काम करण्याचं कौशल्यही त्यांनी प्राप्त केलं आहे. लहानपणी दुर्दैवानं त्यांचे पाय अधू झाले; मात्र त्याचा बाऊ न करता त्यांनी कलेचा ध्यास घेतला, जिद्दीनं वाटचाल केली आणि यश खेचून आणलं
‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ लोकनाट्याची द्विशतकपूर्ती; आज ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान रत्नागिरी : अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या अस्सल संगमेश्वरी बोलीतील लोकनाट्याचा द्विशतकपूर्ती सोहळा १४ जानेवारी २०२० रोजी रत्नागिरीत होणार आहे. या निमित्ताने आयोजित प्रयोगादरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ लोककलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. या
‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत रत्नागिरी : ‘कोकनातली लोककला कशी... बगन्यासारी...’ या नाटकातल्या तात्या गावकराच्या डायलॉगची रसिकांना पुरेपूर अनुभूती देऊन सादर झालेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या नाट्यकृतीने तिवरेवासीयांसाठी लाखभराचा मदतनिधी उभारला. शनिवारी (१३ जुलै) सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language